२७ सप्टेंबर पासून सीपीआर हॉस्पिटल सर्व रुग्णांसाठी खुले होणार

24092021_184002.JPG

कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आधारवड असणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अर्थात सीपीआर हॉस्पिटलमधील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग वगळून इतर सर्व चिकित्सालयीन विभागांचा बाह्यरुग्ण विभाग व अपंग प्रमाणपत्राबाबतचे कामकाज सोमवार दि. 27 सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ.अनिता सायबन्नावार यांनी दिली आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे सीपीआर रुग्णालयात बाह्य रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने कोविड १९ बाधित रुग्णांकरीता ५० टक्के व अन्य व्याधिग्रस्त रुग्णांकरीता ५० टक्के भाग राखून ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी दिल्या होत्या. अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागामध्ये डॉक्टर संवर्गात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सद्यस्थितीत बाह्यरुग्ण विभाग सुरु होणार नसून फक्त अपंग प्रमाणपत्राबाबतचे कामकाज दर बुधवारी सुरु राहील. अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णांच्या अत्यावश्यक सेवा ह्या सध्या अपघात विभागामधून सुरु राहतील तसेच आपत्कालीन परिस्थितीत दाखल होणाऱ्या रुग्णांच्या शस्त्रक्रियाही सुरु राहतील.कोविड १९ च्या अनुषंगाने शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करून बाह्यरुग्ण विभाग व अपंग प्रमाणपत्राबाबतचे कामकाज पार पाडण्यात येणार आहे. तसेच रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांनी रुग्णालयात आल्यानंतर कोविड १९ च्या अनुषंगाने सामाजिक अंतर व सर्व नियमांचे काटेकार पालन करावे, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अनिता सैबन्नावार यांनी केले आहे.