चिखली आणि आंबेवाडी गावातील लोकांचे स्थलांतर

22072021_171704.jpg

3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने यावर्षी पहिल्यांदाच इशारा पातळी ओलांडली आहे. बारा तासांपासून कोल्हापुरात मुसळधार सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत चालली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला असून गावातील नागरिकाचे स्थलांतर करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी मराठीयन शी बोलताना दिली. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.नदीकाठी आंबेवाडी आणि प्रयाग चिखली ही दोन महत्वाची गावं आहेत. या दोन गावात पुराचा फटका अधिक बसत असल्याने येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी आंबेवाडी आणि चिखली या ठिकाणी प्रांताधिकारी आणि करवीर च्या तहसीलदार यांनी बैठक घेतली. लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रथम गर्भवती, वृद्धांना प्राधान्याने स्थलांतरीत केले जात असून त्यांची अँटीजेन टेस्ट देखील करणार असल्याचं प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले. दरम्यान इशारा पातळी ओलांडल्याने चिखलीकर आणि आंबेवाडीच्या गावकऱ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरु आहे. एका बाजूला कोरोनाचा संसर्ग आणि दुसऱ्या बाजूला पूर परिस्थिती यामुळे जिल्हा प्रशासनापुढे मोठं आव्हान निर्माण झाले आहे.