कोल्हापूर शहरात अनेक घरात पुराचे पाणी शिरले,शहरवासियांची तारांबळ

22072021_162405.jpg

कोल्हापूर शहरात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या तुफान पावसामुळे रामानंदनगर, सुतारवाडा, शाहूपुरी कुंभारगल्ली, मुक्त सैनिक वसाहत येथील अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने शहरवासियांची एकच तारांबळ उडाली. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांसह अग्निशमन दलांनी तात्काळ धाव घेऊन घरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे जयंती नाल्यातील पाण्याचा प्रवाह थांबला आहे. त्यातच रात्रभर कोसळणाऱ्या तुफान पावसाने कळंबा तलाव काठोकाठ भरला आणि त्यातील पाणी सांडव्यावरुन वेगाने बाहेर पडले. त्यामुळे रामानंदनगर पुलावर पाणी आले.तसेच रामानंद नगरातील शंभरहून अधिक घरात पाणी शिरले.पहाटेच्या वेळी अचानक पाण्याची पातळी वाढल्याने घरातील नागरिकांनी पहिल्या माळ्यावर धाव घेतली.अग्निशमन दलाची पथके तेथे पोहचली, त्यांनी नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे आवाहन केले. पण नागरिकांनी घरातून बाहेर पडण्यास नकार दिला. दरम्यान त्याठिकाणी आमदार ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे पोहचले. त्यांनी अग्निशमन दलाची बोट घेऊन जाऊन नागरिकांनी बाहेर पडण्याची विनंती केली. पाण्याची पातळी आणखी वाढण्याअगोदर बाहेर पडा अशी विनंती करताच नागरिकांनी बाहेर पडण्यास सहमती दिली.