कोल्हापूर जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट

22072021_154821.jpg

भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 ते 25 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. 22 जुलै करिता रेड तर 23 जुलै करिता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आलंय.जिल्ह्यातील सर्वच डोंगराळ भागामध्ये म्हणजेच चंदगड, आजरा, राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा व भुदरगड या ठिकाणी 22 जुलैला सकाळी 8 वाजेपर्यंत 150 ते 200 मिमी किंवा त्यापेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील करवीर, कागल, हातकणंगले व शिरोळ या तालुक्यांमध्येही 80 ते 125 मिमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे पंचगंगा, दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा व वेदगंगा या नद्या आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इशारा पातळीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीजवळ पोहोचलेली आहे, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. तिकडे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने सांगली-कोल्हापूरला थोडा दिलासा मिळालेला आहे.