जयसिंगपूर-कोथळी दरम्यानचा रेल्वे फाटक तीन दिवस बंद

21072021_174712.JPG

रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी जयसिंगपूर-कोथळी दानोळी मार्गावरील रेल्वे फाटक उद्यापासून तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. भारतीय रेल्वेच्या मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गावरील जयसिंगपूर रेल्वे स्थानक लागत असणाऱ्या गेट नंबर 5 वरील रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम 22 जुलै रोजी सकाळी आठ वाजल्या पासून ते शनिवार 24 जुलै रात्री आठ या कालावधीत होणार आहे.त्यामुळे जयसिंगपूर कोथळी दानोळी उमळवाड या मार्गावरील वाहतूक तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिरोळ तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम व राज्य परिवहन मंडळास दिली आहे. दरम्यान कोथळी, दानोळी परिसरातील नागरिकांना जयसिंगपूरला ये जा करण्यासाठी अंकली बायपास द्वारे वाहतूक करावी लागणार आहे. सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे या परिसरातील वैद्यकीय उपचारासाठी जयसिंगपूर येथील दवाखान्यात आणावे लागते त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून हा रस्ता खुला करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे.