नूलमध्ये म्युकर मायकोसिसने युवकाचा मृत्यू

21072021_173743.jpg

गावातील कोरोनाच संकट संपत नाही तोपर्यंत गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे म्युकर मायकोसिसने एका युवकाचा बळी घेतला. नूल येथे कोरोनाचे रूग्ण असल्यामुळे लॉकडाऊन सुरू आहे. मार्चपासून १५४ जणांना कोरोनाची बाधा झालीय. सध्या १८ रूग्ण सक्रीय आहेत. अशातच एका युवकास म्युकर मायकोसिस झाल्यामुळे गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे.गावातील हा युवक ट्रॅक्टर ड्रायव्हरचे काम करून चरितार्थ चालवत होता. काही दिवसांपूर्वी तो आजारी पडला. त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातून त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते.मात्र, कोरोना बरोबरच डोळ्यांचा आजार बळावला. म्युकर मायकोसिसचे निदान झाले. त्यातच त्याचा डावा डोळा पूर्णपणे निकामी झाला. अखेर त्याचा बुधवारी मध्यरात्री मृत्यु झाला. कोल्हापूरातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तो अविवाहीत होता. त्याच्या पश्चात विधवा आई, तीन विवाहीत बहिणी असा परिवार आहे.