मायक्रोसॉफ्ट अमेरिकेतील टिकटॉकचा व्यवसाय करणार खरेदी

01082020_124246.jpg

सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाईटडान्स यांच्यादरम्यान सध्या चर्चा सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. याअंतर्गत मायक्रोसॉफ्ट अमेरिकेतील टिकटॉकचा व्यवसाय खरेदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोमवारपर्यंत ही डील पूर्ण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. परंतु अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही टिकटॉकवर बंदी घालू शकतो या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. तसंच ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार मायक्रोसॉफ्ट व्यतिरिक्त अन्य कंपन्यादेखील हा व्यवसाय विकत घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, अमेरिकेतही टिकटॉकवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनी आपला व्यवसाय विकण्यासाठी ही रणनिती वापरत असल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एक मोठी कंपनी टिकटॉकचा व्यवसाय विकत घेण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात आलं. पण त्यांनी या कंपनीचं नाव सांगण्यास मात्र नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या सुरक्षेबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर गुंतवणुकदारांनी बाईटडान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी झांग यामिंग यांना काही प्रस्ताव दिले आहेत. यापैकी कोणत्याही प्रस्तावाला अमेरिकेच्या परदेशी गुंतवणुकीबाबत तयार करण्यात आलेल्या समितीचाही सामना करावा लागेल. तसंच अमेरिकेच्या अँटी ट्रस्ट रेग्युलेटरीचीदेखील मंजुरी घ्यावी लागेल.