कोल्हापूर: महेश कांबळे
३ मे रोजी भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेले कोल्हापूरच्या राजघराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांच्या खासदारकीची मुदत संपली, यानंतर कोल्हापुरात एका खासगी कार्यक्रमात बोलताना १२ मे रोजी आपली भूमिका जाहीर करणार होते, त्यानुसार गुरुवारी त्यांनी आपली भूमिका जाहीर केली, स्वराज्य या नव्या राजकीय संघटनेची घोषणा करून जुलै मध्ये होणारी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे सांगत सर्वपक्षीयांनी छत्रपती शिव-शाहूंच्या वैचारिक वारसाला पाठिंबा द्यावा असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. राज्याच्या राजकारणात संभाजीराजेंना नाराज करणे कोणत्याही राजकीय पक्षाला आता परवडणारे नाही. त्यामुळे संभाजीराजेंच्या या मास्टरस्ट्रोकचे परिणाम राज्याच्या राजकारणामध्ये नक्कीच दिसणार आहेत.
4 जुलै 2022 रोजी राज्यातील 19 राज्यसभा सदस्यांपैकी 6 राज्यसभा खासदारांची मुदत संपणार आहे, यामध्ये भाजपकडून राज्यसभेवर निवडून गेलेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून पी चिदंबरम यांचा समावेश आहे. 3 मे रोजी राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपलेले कोल्हापूरच्या राजघराण्याचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी या निवडणुकीसाठी पुन्हा शड्डू ठोकला आहे, 2016 मध्ये राज्यसभेवर निवड झाल्यानंतर संभाजीराजेंनी व्यापक स्वरूपात दिल्लीमध्ये केलेला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा, किल्ले संवर्धनासाठी दिलेले योगदान, मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची राहिलेली भूमिका आणि त्यांनी पिंझुन काढलेला चांद्यापासून बांद्यापर्यंतचा अखंड महाराष्ट्र यामुळे राज्यातील मराठा समाजाचे वलय त्यांच्याभोवती निर्माण झाले, भाजपने दिलेल्या खासदारकीची पक्षीय झूल बाजूला ठेवत संभाजीराजेंना संघटन कौशल्याच्या बळावर महाराष्ट्रात व्यापक जनाधार मिळाला, फक्त मराठाच नाही तर बहुजन समाज ही त्यांच्याशी जोडला गेला. राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपल्यानंतर संभाजीराजे कोणती भूमिका मांडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते, संभाजीराजांनी गुरुवारी स्वराज्य या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करून होऊ घातलेली राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे जाहीर केले, आता राज्यातील 19 राज्यसभा सदस्यांपैकी 8 जागा भारतीय जनता पक्षाकडे, 4 जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे, काँग्रेस 3 शिवसेना 3 तर एका जागी भाजपचा मित्रपक्ष असलेला आरपीआय प्रतिनिधित्व करत आहे, जुलैमध्ये राज्यातील 6 जागा रिक्त होणार असून यातील एका जागेवर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वंशज म्हणून सर्व राजकीय पक्षांनी मला पाठिंबा द्यावा असा मास्टरस्ट्रोकच संभाजीराजेनीं खेळला आहे, राजकीय पक्षांच्या पाठिंब्याशिवाय राज्यसभेची वाटचाल खडतर असल्याने संभाजीराजेंच्या आवाहनाचा राज्यातील राजकीय पक्षांना सहानुभूतीपूर्वक विचार करावाच लागेल, संभाजीराजेंना नाराज करणे आता कोणत्याही राजकीय पक्षाला परवडणारे नाही, यामुळे नवा राजकीय पक्ष आणि राज्यसभेच्या खासदारकीच्या पाठिंब्यासाठी खेळला गेलेला मास्टरस्ट्रोक संभाजीराजेंच्या राजकीय प्रगल्भतेची चुणूक ठरेल यात शंका नाही.