34 c Kolhapur
महत्वाच्या घडामोडी

शूटिंग रायफल, अग्निशमन, हस्तकला, समुपदेशनमध्ये रमले विद्यार्थी

M

कोल्हापूर : शूटिंग रायफलीचे विविध प्रकार, वापरण्याची पध्दत, अग्निशमन उपकरणाची प्रात्यक्षिके, हस्तकला, समुपदेशन अशा विविध सत्रांमधून कुशिरे आश्रमशाळा येथे आयोजित चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या दोन दिवसीय निवासी शिबिरास शनिवारी प्रारंभ झाला. निवृत्त कर्नल अमरसिंह निकम यांच्या हस्ते फुलरोपांचे रोपण करुन शनिवारी सकाळी ९.३० वाजता या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी निकम यांनी राष्ट्रभक्ती, देशसेवा, शिस्त, चिकाटी, देशाच्या विकासामध्ये मुलांचा वाटा, भारतीय सैन्य दलाची माहिती व स्वरूप अशा विविध मुद्द्यांच्या आधारे मुलांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये कोल्हापूर जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांनी विविध खेळ आणि संकल्पनांच्या माध्यमातून मुलांचे समुपदेशन केले. मोबाईलचा सकारात्मक स्वयंनियंत्रण, आहार, किशाेरवयीन मुलांच्या स्वभावात होणारे बदल, पालकांची अपेक्षा, मुलांचे बदलते वय, मुलांच्या समस्या या सर्व मुद्द्यांबद्दल सविस्तर चर्चा केली व मार्गदर्शन केले. ऑलम्पिक टारगेट शूटिंग रेंज टिंबर मार्केट या शूटिंग रेंजचे व्यवस्थापक सचिन पाटील आणि मार्गदर्शक सुहास जगदाळे यांनी रायफलींचे प्रकार, ते वापरण्याची पद्धत, रेंजवर उभारण्याची पद्धत याशिवाय या गेम मधून भविष्यात निर्माण होणारे करिअर याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी सर्व मुलांना प्रत्यक्ष रायफल हाताळण्याची संधी देण्यात आली. दुपारच्या सत्रामध्ये अग्निशमन उपकरणाचे व्यवसायिक राजाराम पात्रे यांनी आगीचे प्रकार, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याविषयी मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक सादरीकरण केले. संध्याकाळच्या सत्रामध्ये मुलांची हस्तकला विकसित व्हावी यासाठी आरती मिलींद कोपार्डेकर यांनी कागद कामाच्या कलाकृती करवून घेतल्या. या शिबिरात शून्य सावली दिवसानिमित्त मुलांनी शुन्य सावलीचाही अनुभव घेतला. या शिबिराचे संचालन मिलिंद कोपार्डेकर, रवींद्र शिंदे, अनिल काजवे, शिवप्रभा लाड यांनी केले. चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव, सुधाकर सावंत, अभय बकरे, चंदू तूदीगल, नसीम यादव, अनुजा बकरे, घनश्याम शिंदे, रोहित कांबळे, ओंकार कांबळे यांनी नियोजन केले.

Read Previous

आमदार जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्य पदाची शपथ

Read Next

नाथाचं रूप घेऊन रावण कृत्य करणाऱ्या बोगस पत्रकारावर कारवाई करा